कांदा निर्यात धोरणातील धरसोडपणामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले:- डॉ.अमोल कोल्हे

1 min read

शिरूर दि.२४:- कांदा निर्यात धोरणातील धरसोडपणामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव देखील मिळाला नाही. या परिस्थितीमुळे गांजलेल्या शेतकऱ्यांनी आज दिल्ली येथे खांद्यावर कांद्याची पिशवी आणि गळ्यात कांद्याच्या माळा घालून अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करीत केंद्र शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. असे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी म्हटले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या आंदोलनात शिरुर तालुक्यातील सागर फराटे, विजय साळुंके, परशुराम मचाले आणि नवनाथ फराटे आदी शेतकरी बांधव सहभागी झाले. कृषी, वाणिज्य तथा प्रधानमंत्री कार्यालय या ठिकाणी या शेतकऱ्यांनी आपला आवाज पोहोचविण्याचा प्रयत्न केला.हे आंदोलन म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचा आक्रोश आहे. या पीकाच्या संदर्भाने गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांची जी ससेहोलपट होतेय, ती संपूर्ण देश पाहतोय. याबाबत संसदेत मी स्वतः अनेकदा भूमिका मांडून शेतकऱ्यांचे म्हणणे शासनापुढे मांडले आहे. आपल्या मतदारसंघातील शेतकरी बांधवांनी आज जी आंदोलनाची भूमिका घेतली ही एका उद्वेगातून आलेली आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घ्यावी. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादकांची जी फरफट चाललेली आहे ती कोणत्याही परिस्थितीत थांबलीच पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!