किरकोळ वादातून सख्ख्या मामानेच भाच्याला संपविले

1 min read

जालना दि.२४:-केदारखेडा-भोकरदन शहरातील पेरजापूर रोडवर राहाणाऱ्या मामा व एका भाच्याने मिळून दुसऱ्या भाच्याचा किरकोळ वादातून काटा काढला आहे. ही घटना शनिवारी (दि.१८) रात्रीला केदारखेडा- भोकरदन रोडवरील डावरगाव पाटीजवळ घडली. ऐन दिवाळी सणाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मृताचे नाव परमेश्वर सुभाष लोखंडे (वय २६ रा.) असे आहे. दरम्यान, पोलिसांनी तपासचक्र फिरवत मामा-भाच्यास अटक केली आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील पोष्ट ऑफिस परिसरात राहत असलेल्या परमेश्वर सुभाष लोखंडे (वय २६) यास दि.१८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान आरोपी मामा अनिल विश्वनाथ कांबळे व मावसभाऊ अर्जुन रावसाहेब रामफळे हे तिघे एका दारूच्या दुकानात गेले. शनिवारी रात्री त्यांनी मद्यप्राशन केले.दारू पित असताना मृत परमेश्वर सुभाष लोखंडे व अर्जुन रामफळे या दोन सख्ख्या मावस भावात वाद झाला. मामा अनिल कांबळे याने दोघांना दुचाकीवरून रात्री उशिरा घरी आणले. घरी आल्यानंतर मावस भाऊ परमेश्वर व अर्जुन यांच्यातील वाद पुन्हा विकोपाला गेला. त्यावेळी रावसाहेब रामफळे व अनिल कांबळे यांनी लाकडी दंडुक्याने केलेल्या मारहाणीत परमेश्वर लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला. परमेश्वर लो खंडे हा मृत झाल्याचे लक्षात येताच आता काय करावे असा प्रश्न या मामा-भाच्याला पडला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी रात्री २ वाजेच्या सुमारास मृताचा मृतदेह अनिल कांबळे यांच्या क्रूझर गाडीत टाकला. त्यानंतर दोघांनी परमेश्वर लोखंडे याचा मृतदेह भोकरदन-जालना रोडवरील वालसा डावरगाव पाटीजवळ रस्त्याच्या कडेला फेकून दिल. त्यानंतर रविवारी (दि.१९) सकाळी ८ वाजेच्या दरम्यान भोकरदन पोलिसांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. भोकरदनचे पोलिस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली मृताची ओळख पटली. त्यानंतर काही तासातच पोलिसांनी आरोपी अनिल कांबळे व अर्जुन रामफळे या दोघांना अटक केली. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितिन कटेकर, पोलिस निरीक्षक किरण बिडवे, उपनिरीक्षक पवन राजपूत, पोलिस उपनिरीक्षक भास्कर जाधव, दत्ता राऊत, रामेश्वर शिनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!