आदि कर्मयोगी अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्याला पुरस्कार

1 min read

दिल्ली दि.१९:- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धरती आबा जनभागीदारी अभियान मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्र आणि ‘आदि कर्मयोगी अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्याला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित आदी कर्मयोगी अभियान राष्ट्रीय परिषदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्य, जिल्हा, तालुके आणि एकात्मिक आदिवासी विकास संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. धरती आबा जनभागीदारी अभियान महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी स्वीकारला. तर आदि कर्मयोगी अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गडचिरोली जिल्हा पुरस्कार जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्वीकारला.आदी कर्मयोगी अभियान राष्ट्रीय परिषद आपल्या शासनाला खऱ्या अर्थाने सहभागी, सर्वसमावेशक आणि लोकसहभागावर आधारित करण्याच्या राष्ट्रीय संकल्पाचे प्रतिबिंब आहे. आदि कर्मयोगी अभियानाची सुरुवात प्रत्येक आदिवासी गावाला स्वावलंबी आणि अभिमानास्पद बनवण्याच्या परिवर्तनकारी दृष्टिकोनातून झाली आहे. या अभियानाचा उद्देश आदिवासी समुदायांना राष्ट्राच्या विकास प्रवासात सहभागी करून घेणे आणि विकासाच्या लाभांचा प्रसार सर्व आदिवासी क्षेत्र आणि लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. आदिवासी कृती आराखडा आदिवासी लोकांच्या आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. आदि कर्मयोगी अभियान ग्रामसभा आणि समुदाय-नेतृत्वाखालील संस्थांना सक्षम करून लोकसहभाग वाढविण्यासाठी चालना देते. आदिवासी समाजाच्या अर्थपूर्ण सहभागामुळे राष्ट्रीय धोरणावर प्रभाव पडू शकतो आणि योजना अधिक प्रभावी बनवता येऊ शकतात, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!