अहमदाबादमधील जैन समुदायानं घेतल्या तब्बल १४९ कोटीच्या आलिशान गाड्या;मिळवला तब्बल २१ कोटी डिस्काउंट
1 min read
अहमदाबाद दि.१९:- अहमदाबादमधील जैन समुदायानं नुकतंच एक असं काम केलं आहे, ज्यावर सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. कारण त्यांनी एकत्र येऊन तब्बल १८६ लक्झरी कार्स खरेदी केल्या आहेत! हो, चुकत नाही वाचत आहात — या खरेदीची एकूण किंमत आहे तब्बल ₹१४९ कोटी ५४ लाख रुपये!
या उपक्रमाचं आयोजन JITO (Jain International Trade Organisation) या संस्थेने केलं आहे, आणि हे भारतातलं पहिलंच असं सामूहिक कार खरेदीचं उदाहरण ठरतंय.या कार्समध्ये Audi, BMW, Mercedes अशा ब्रँड्सच्या गाड्या आहेत.प्रत्येकीची किंमत ₹६० लाखांपासून ₹१.३४ कोटींपर्यंत आहे.
एवढं मोठं ऑर्डर एकत्र दिल्यामुळे या खरेदीवर JITO समुदायाला मिळाला तब्बल ₹२१ कोटी २२ लाखांचा डिस्काउंट! म्हणजेच समुदायाने एकत्र येऊन, एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गाड्या विकत घेऊन, कंपन्यांकडून जबरदस्त सवलत मिळवली.
हे खरं तर फक्त कार खरेदीचं प्रकरण नाही, तर एका व्यावसायिक दृष्टिकोनातून घेतलेला अत्यंत बुद्धिमान निर्णय आहे. कारण जेव्हा शेकडो लोक एकत्र येऊन एकाच वेळी खरेदी करतात, तेव्हा त्यांच्या बोलण्याची ताकदही वाढते. डीलरशिपलाही एकाच वेळी मोठा व्यवसाय मिळतो,त्यामुळे दोन्हीकडं फायदेशीर परिस्थिती तयार होते.
JITO चं म्हणणं आहे की हा उपक्रम फक्त सुरुवात आहे. पुढे ते अशा सामूहिक खरेदीचे प्रयोग इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी, औषधे,आणि इतर वस्तूंमध्ये देखील करणार आहेत. म्हणजेच, भविष्यात कदाचित जैन समुदाय फक्त एकत्र पूजा नाही तर एकत्र स्मार्टफोन आणि टीव्ही खरेदी करताना दिसेल!
गुजरातमध्ये अशा प्रकारचं सामूहिक खरेदीचं मॉडेल आधीही पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी भरवाड समुदायाने १२१ JCB मशीन एकत्र खरेदी केली होती, ज्यावर त्यांनी प्रत्येकी सरासरी ₹३.३ लाखांची बचत केली. म्हणजेच, “एकटा शेतकरी काय करणार?” या म्हणीचं उत्तर, “एकत्र शेतकरी सगळं करु शकतो!” असं त्यांनी दाखवून दिलं.
हे सगळं दाखवून देतं की,गुजराती समाजात आर्थिक एकजूट आणि व्यवसायिक बुद्धिमत्ता किती खोलवर रुजलेली आहे. जिथं इतर लोक एकट्याने फायदा शोधतात, तिथं हे लोक समुदायाच्या ताकदीने सौदेबाजी करतात. हे केवळ श्रीमंतीचं प्रदर्शन नाही, तर “एकत्र येऊन जिंकायचं” या विचाराची एक झलक आहे.
