सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांना दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक

1 min read

पिंपरी दि. १८:- खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी महिलेकडून दीड लाख रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राधिकरण, निगडी येथे शनिवारी (दि. १७) ही कारवाई केली.

सहायक पोलीस निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे, पोलीस कर्मचारी सागर तुकाराम शेळके, खासगी व्यक्ती सुदेश शिवाजी नवले (४३, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार ४८ वर्षीय महिलेने तिच्या ओळखीच्या व्यक्तीला हातउसने व बँकेमधून कर्ज काढून पैसे दिले होते. मात्र, बँकेच्या कर्जाचे हप्ते न भरल्याने तक्रारदार महिलेने उसने दिलेल्या पैशांची मागणी केली.

त्यामुळे संबंधित व्यक्तीने तक्रारदार महिलेविरोधात निगडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. हा अर्ज चौकशीसाठी सहायक पोलीस निरीक्षक अमोल कोरडे याच्याकडे होता.

यात खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक निरीक्षक कोरडे, पोलीस कर्मचारी सागर शेळके व खासगी व्यक्ती नवले यांनी तक्रारदार महिलेकडे दीड लाख रुपये लाचेची मागणी केली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे