निगडी बस स्टॉपसमोर इलेक्ट्रिक बसला आग अग्निशमन दलाने क्षणात विझवली ज्वाळा

1 min read

पिंपरी दि.११:- निगडी बस स्टॉपसमोर उभ्या असलेल्या पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बसला शुक्रवारी (दि.१०) दुपारी ३.१७ वाजता अचानक आग लागली. प्राधिकरण उप अग्निशमन केंद्र आणि मुख्य अग्निशमन केंद्राच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत काही मिनिटांतच आग पूर्णपणे विझवली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.प्राधिकरण उप अग्निशमन केंद्राने दिलेल्‍या माहितीनुसार, दुपारी बसला आग लागल्‍याची माहिती मिळताच अग्‍निशामक दलाचा बंब घटनास्थळाकडे रवाना झाला. केवळ दोन मिनिटांत म्हणजेच ३.२० वाजता घटनास्थळी पोहोचले. त्‍यानंतर अग्‍निशामक मुख्‍यालयातून आणखी एक बंब घटनास्‍थळी दाखल झाला. जवानांनी पाहणी केली असता बसच्या आतील भागातून धूर व ज्वाळा निघताना दिसल्या. नागरिकांकडून विचारपूस केल्यावर बसमध्ये कोणीही व्यक्ती अडकलेली नसल्याची खात्री झाली. तत्काळ जवानांनी होज रिल आणि डिलिव्हरी होजच्या साहाय्याने आग विझवण्याचे काम सुरू केले आणि काही मिनिटांतच आग पूर्णतः नियंत्रणात आणली.अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, बसमधील इलेक्ट्रिकल प्रणालीमध्ये नेमकी आग कशामुळे लागली हे शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत अग्निशमन केंद्राचे अधिकारी व जवान अनिल डिंबळे (एसओ), गौतम इंगवले (एसओ), प्रतीक कांबळे (पीएसओ), संभाजी अवतारे, दीपक ढवळे, चत्तरसिंग बेडवाल, संकेत थोरात, आकाश थोरात, सौरव इंगवले, अमोल चिपळूणकर, विशाल घोडे, मुकुंदराज कोरटकर, सानिका सुर्वे, स्नेहा आंबेकर, अनिकेत बोऱ्हाडे, रोहन औटी, यशराज लांडगे, दिलीप गायकवाड यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!