शिवसेनेच्या खटला सुनावणीला तारीख पे तारीख
1 min read
मुंबई दि.९:- शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. २०२२ मध्ये एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.
काल (८ ऑक्टोबर) या प्रकरणाचा निकाल लागण्याची आस ठाकरे गटाचे नेते धरून बसले होते.मात्र,या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे खंडपीठाने सांगितले. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे.
या निवडणुकीपूर्वी शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत सुनावणी केली जावी, अशी हस्तक्षेप याचिका ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेची (ठाकरे) बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मांडत आहेत. आता १२ नोव्हेंबरच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
