कच्च्या तेलाचे दर घसरले; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? दरकपात होण्याची शक्यता
1 min read
मुंबई दि.३:- जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे आता देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाचा प्रति बॅरलचा भाव सध्या $64 पर्यंत खाली आला आहे जी गेल्या चार महिन्यांतील सर्वात कमी पातळी आहे. याआधी जून महिन्यात हा दर $77 पर्यंत वाढला होता परंतु जागतिक युद्ध, अमेरिकेतील ट्रम्प टॅरिफ आणि देशांतर्गत शटडाऊन यांसारख्या विविध जागतिक घडामोडींचा परिणाम म्हणून किमती खाली आल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर घसरल्यामुळे देशातील खाजगी रिफायनरी कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे.
या संधीचा फायदा घेऊन त्यांनी सप्टेंबर महिन्यात कच्च्या तेलाची आयात वाढवली, जी प्रतिदिन 9 लाख 70 हजार बॅरल इतकी नोंदवली गेली.या कंपन्यांनी त्यांच्या एकूण गरजेपैकी 60% पेक्षा जास्त तेल रशियाकडून खरेदी केले. स्वस्त दरात कच्चे तेल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करणे आणि पेट्रोलियम उत्पादने तयार करून
ती आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करणे या उद्देशाने कंपन्यांनी आयात वाढवली आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यावर त्याचा फायदा ग्राहकांनाही मिळाला पाहिजे अशी अपेक्षा नेहमीच असते. आता दर $64 पर्यंत खाली आल्यामुळे
देशातील तेल कंपन्या आणि सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करून सामान्य नागरिकांना दिलासा देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्राहकांना दरकपातीची मोठी संधी निर्माण झाली आहे.