राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; २१ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
1 min read
मुंबई दि.३:- सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील अनेक भागांना जोरदार पावसाने झोडपून काढल्यानंतर काही दिवसांची विश्रांती मिळाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हवामानाने करवट बदलली आहे! २ ऑक्टोबरपासून राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असन आज शुक्रवारी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.राज्यातील एकूण २१ जिल्ह्यांना या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. आज मुंबई, पालघर आणि ठाणे: येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग: या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली: या भागांत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. सोलापूर: येथे मात्र वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथा परिसर: येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि जालना: या ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव (उस्मानाबाद): या ६ जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
धुळे आणि नंदुरबार: येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर (अहमदनगर): या तीन जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे.
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकंदरीत, ३ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत.त्यामुळे, नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.