यंदा राज्यात दसऱ्याला राज्यात ५ दसरा मेळावे होणार
1 min read
मुंबई दि.१:- महाराष्ट्रासाठी दरवर्षी दसरा मेळावा फार महत्त्वाचा आहे. कारण याच दसरा मेळाव्याच्या दिवशी राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी योजना, विधानं केली जातात. दरवर्षी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा असतो. मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचाही दसरा मेळावा भरतो.
भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यादेखील भगवानगडावर आपला वेगळा दसरा मेळावा घेतात. तर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे हेदेखील नारायण गडावर आपला दसरा मेळावा आयोजित करत आहेत.
उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याची जय्यत तयारी
शिवसेनेची शकलं होण्याआधी दरवर्षी मुंबईतील शिवाजी मैदानावर या पक्षाचा मोठा दसरा मेळावा आयोजित केला जायचा. मात्र आता या पक्षाचे दोन गट पडल्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादरमधील शिवाजी मैदानावर आयोजित केला जातो. यावेळीदेखील हा दसरा मेळावा शिवाजी मैदानावरच होणार आहे.
यंदाचा दसरा मेळावा अनेक अर्थांनी वेगळा ठरण्याची शक्यता आहे. कारण या मंचावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही नेते युतीचीही घोषणा करू शकतात, असे सांगितले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यानिमित्त 2 ऑक्टोबर रोजी आपल्या भाषणात काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याचे ठिकाण बदलले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आपला दसरा मेळावा आयोजित करतात. आपल्या दसरा मेळाव्यात ते शिवसैनिकांना संबोधित करतात. या वर्षी त्यांचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार होता. आता मात्र त्यांच्या मेळाव्याचे ठिकाण बदलण्यात आले असून तो यंदा आझाद मैदानाऐवजी नेस्को सेंटरमध्ये होणार आहे.
केवळ एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी नेस्को येथे दसरा मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे हेदेकील रात्री सात ते नऊ वाजेच्या दरम्यान दसरा मेळाव्यासाठी आलेल्यांना संबोधित करत असतात. त्यामुळे यावेळच्या दसरा मेळाव्यात शिंदे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे यांचाही दसरा मेळावा
मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांचाही बीड जिल्ह्यात दसरा मेळावा होणार आहे. बीडच्या नारायणगडावर या दसरा मेळाव्याची तयारी सुरू झालेली आहे.
भगवान गडावरदेखील जय्यत तयारी
भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यादेखील दरवर्षी दसरा मेळावा घेतात. त्यांचा हा मेळावा बीड जिल्ह्यातील भगवान गडावर होत असतो. यावेळीही पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
संघाच्या शस्त्रपूजनाकडेही विशेष लक्ष
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी संघातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असणार आहे. दसऱ्याच्या दिवशी संघाकडून शस्त्रपूजन केले जाते.
यंदाच्या विजयादशमीपासून संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत आपल्या भाषणात स्वयंसेवकांना नेमका कोणता उपदेश करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाचीही जय्यत तयारी
संघाच्या दसरा मेळाव्यासोबतच दरवर्षी नागपुरात दसऱ्याच्या दिवशी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या कार्यक्रमाचीदेखील जय्यत तयारी चालू आहे. 2 ऑक्टोबर रोजी नागपुरात पाऊस येण्याची शक्यता असल्याने या सोहळ्याला येणाऱ्या लाखो अनुयायांची व्यवस्था दीक्षाभूमीच्या परिसरातील शाळा,
कॉलेज आणि समाज भवनानमध्ये केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून शाळा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. शाळांच्या परिसरात सौचालय आणि इतर व्यवस्था केल्या जात आहेत.
69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने देशभरातून लाखोच्या संख्येने अनुयायी दीक्षाभूमीवर येणार आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी भोजनदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच पाऊस आल्यास राहण्याची व्यवस्थाही करण्यात येत आहे.
