श्रीरामपूरात दोघांकडून ३ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुसे जप्त

1 min read

अहिल्यानगर दि.२६:- श्रीरामपूर शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांकडून ३ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुसे, ६ मॅगेझिन, २ मोबाईल व मोटार असा ७.३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संदर्भात चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.विशेष म्हणजे गेल्या महिन्यात श्रीरामपूर शहरातील शिवाजी रस्त्यावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणानंतर पोलिसांनी राबवलेल्या शोधमोहिमेत १० गावठी कट्टे यापूर्वी जप्त करण्यात आले होते.बबलू ऊर्फ इम्तियाज अजित शहा (वय ३५, रा. बाबापुरा चौक, श्रीरामपूर), नदीमखान साबीरखान (वय ३०, चाळीसगाव, जळगाव), ऋतुराज बाळासाहेब दाणी व नंदकिशोर संजय शिरसाट (दोघे रा. श्रीरामपूर) या चौघांना अटक करण्यात आली आहे. बबलू शहा व नदीमखान या दोघांनी गावठी कट्टे विक्रीसाठी आणले होते. त्यासाठी ऋतुराज दाणी व नंदकिशोर शिरसाठ यांनी खरेदीसाठी आगाऊ रक्कम दिली होती. एकूण १ लाख २० हजार रुपयांमध्ये हा व्यवहार ठरला होता, असेही सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले.अतिरिक्त पोलीस अधीक्षक वाकचौरे यांचे पथक तसेच श्रीरामपूर शहर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई आज, बुधवारी श्रीरामपूर मधील संजयनगर रस्त्यावरील मिल्लतनगर येथे सापळा लावून केली. ईर्टीगा मोटारीमध्ये डॅशबोर्ड व सीटखाली ही शस्त्रे दडवण्यात आली होती. दाणी हा मोटर विक्रीचा व्यवसाय करतो तर शिरसाट हा शेतकरी आहे. बबलू शहा याच्यावर खून, खंडणी, दरोडे, शस्त्र प्रतिबंध आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर नदीमखान याच्यावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात मारहाण, शस्त्र प्रतिबंधक गुन्हे दाखल आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!