धनंजय मुंडेंनी मनातील इच्छा तटकरे समोर केली व्यक्त
1 min read
रायगड दि.२३:- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचा कर्जत येथे नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला धनंजय मुंडेदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मनातील इच्छा तटकरे यांच्यासमोर व्यक्त केली आहे.
मला यापूर्वी विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळाले होते. त्यावेळी सुनील तटकरे हे विरोधी पक्षनेते होणार होते. परंतु, त्यांनी मोठे मन करून ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्यामुळेच आज मी तुमच्यासमोर उभा आहे. आज सुनील तटकरे यांना भारतभूषण पुरस्कार देण्यात आला आहे.
त्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी इथे उभा आहे. मी संपूर्ण बीडमधील जनतेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. तसेच परळीच्या वैद्यनाथाला प्रार्थना करतो, की सुनील
तटकरे यांना आमच्यापेक्षाही चांगले आरोग्य मिळावे. आम्ही थकलो तरी आम्हाला हात देऊन उठवू शकतील इतके चांगले आरोग्य त्यांना मिळावे, यासाठी प्रार्थना करतो.
माझी तटकरे यांना विनंती आहे, की त्यांनी कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावे. आम्ही चुकलो तर आमचे कान धरावे. पण आता रिकामे ठेवू नका. जबाबदाऱ्या द्या एवढीच मी त्यांना विनंती करतो, असे मुंडे म्हणाले.माझ्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत तटकरे यांची वडीलकीची साथ व भक्कम पाठबळ मला लाभले आहे.
देशाच्या संसदेत काम करताना देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन तटकरे यांनी आजवर काम केले, त्याच हिरीरीने आणि विश्वासाने पक्षातदेखील नवतरुण चेहऱ्यांना संधी देत पक्षालादेखील एका उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले आहे. दरम्यान, ते (धनंजय मुंडे) मला म्हणालेत, की काम द्या. याचे वेगवेगळे अर्थ आहेत. वेगवेगळे अर्थ घेता येतील.
त्यासंदर्भात योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. कारण त्यांनी राजीनामा दिला त्याची काही कारणे आहेत. न्यायालयीन प्रक्रिया व चौकशी चालू आहे. त्यासंदर्भात आमचे पक्षश्रेष्ठी, महायुतीचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार एकत्र बसून निर्णय घेतील, अशी मुंडे यांच्या मागणीवर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
