लाचखोर तलाठी गजाआड; लाचलुचपत विभागाची पारनेरमध्ये कारवाई
1 min read
पारनेर दि.२०:-सातबारा नोंदीसाठी आठ हजारांची लाच घेणारा ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. ही कारवाई बुधवारी (ता. १७) पारनेर तालुक्यातील वाडेगव्हान येथे करण्यात आली.
दीपक भिमाजी साठे (वय-३६, रा. हंगा, ता. पारनेर) असे लाच घेतलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराने आपला मुलगा व दोन पुतण्यांच्या नावे १ एकर २० गुंठे जमीन खरेदी केली होती. या खरेदी खताचा फेरफार करून सातबारा नोंद घेण्यासाठी ग्राम महसुल अधिकारी साठे यांनी १० हजार रूपयांची मागणी केली.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची खात्री करण्यासाठी पडताळणी करण्यात आली असता साठे यांनी प्रत्यक्षात १० हजार रूपयांची मागणी केली.
पुढे तडजोड करून ८ हजार रूपये घेण्याची सहमती दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पंचासमक्ष साठेला लाच घेताना पकडले.
