श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे राजुरीत जल्लोषात स्वागत
1 min read
आळेफाटा दि.१४:- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा मानाच्या लाकडी पलंगाचे यादव कालीन परंपरेप्रमाणे राजुरी(ता.जुन्नर)या ठिकाणी शुक्रवार दि.१२ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जल्लोषात आगमन झाले.
राजुरी येथील तिळवण तेली समाजातील कै. बाबुराव व आप्पा रामभाऊ शिंदे (मेहतर) या घराण्याकडे पलंगाची सेवा करण्याचा मान परंपरेने आहे. या गावात परंपरेप्रमाणे भाद्रपद पितृपक्ष षष्ठी या दिवशी पलंगाचे आगमन होत असते. पुणे जिल्ह्यातील आणि जुन्नर तालुक्यातील शेवटच्या मुक्कामाच ठिकाण म्हणून राजुरी गावाकडे पाहिले जाते.
पलंगाचे आगमन राजुरी मध्ये झाल्यानंतर पलंगाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सर्व भाविक सेवेकऱ्यांनी व ग्रामस्थांनी घरोघरी पायघड्या घालून,रांगोळ्या काढून पलंगाचे स्वागत केले.मिरवणुकीमध्ये नऊ दुर्गांचा (देव्यांचा) जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. मिरवणूक संपन्न झाल्यानंतर पलंग शिंदे यांचे घरी दर्शनासाठी ठेवण्यात आला.
त्यानंतर पलंगाची महाआरती संपन्न होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला. सुमारे ४ हजार भाविकांनी पलंगाचे दर्शन घेतले. यावेळी राजुरी, उंचखडक गावचे सरपंच उपसरपंच, तिळवण तेली समाज तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ भाविक सेवेकरी उपस्थित होते.दरम्यान दुसऱ्या दिवशी शनिवार दि. १३ रोजी पलंगाचे श्री क्षेत्र तुळजापूर कडे प्रस्थान झाले.
पलंग बेल्हे-अळकुटी-पारनेर-नगर-जामखेड मार्गे विजयादशमीच्या आदल्या दिवशी तुळजापूर मध्ये दाखल होतो. तुळजापूर येथे रात्री पलंगाची मिरवणूक होऊन पलंग मंदिरामध्ये आणला जातो सीमोल्लंघन सोहळा झाल्यानंतर सिहांच्या गाभार्यात या पलंगावर तुळजाभवानी देवीची मुख्य चल मूर्ती निद्रेसाठी विराजमान केली जाते.
विजयादशमी ते पलंगी (कोजागरी) पौर्णिमा या काळात तुळजाभवानी देवी या लाकडी पलंगावर श्रम निद्रा घेते. पौर्णिमेच्या दिवशी पलंगावरून तुळजाभवानीची मूर्ती उचलून पुन्हा सिंहासनावर स्थापन केली जाते. पलंगाची निर्मिती व बांधणी करण्याचा मान घोडेगाव येथील तिळवण तेली समाजाला आहे.
तर पलंग घोडेगावहून तुळजापूरला पायी नेण्याचा मान नगर येथील तेली पलंगे परिवाराकडे आहे. पलंगावर नगर येथील तेली पलंगे परिवाराकडून दिली जाणाऱ्या मानाच्या गादीची स्थापना करण्याचा मान जुन्नर येथील तिळवण तेली समाजाला आहे. पलंगाच्या लाकडावर कातीव कोरीवकाम घोडेगाव येथील ठाकूर कुटुंब करते तर पलंगाच्या सुट्ट्या भागांची जोडणी घोडेगाव येथील भागवत कुटुंबीय करतात.
