महागाईने होरपळलेल्या जनतेला मिळणार दिलासा; सर्वसामान्यांना मोठा दिलासा
1 min read
नवीदिल्ली दि.४:- केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे देशात आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असेल. दोनच जीएसटी स्लॅब असतील. सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, म्हणजे 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.नवी दिल्लीत जीएसटी कौन्सिलची महत्त्वाची बैठक पार पडली.
त्यामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्यदिनीच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये बदल होणार असे सांगितले होते. त्यावर आता बैठकीत निर्णय झाला. देशात लागू असलेल्या 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे ज्या गोष्टींवर आधी 28 टक्के जीएसटी लागायचा त्यावर आता 18 टक्के जीएसटी लागणार आहे.त्याचबरोबर ज्या गोष्टींवर आधी 12 टक्के जीएसटी लागायचा, त्यावर आता पाच टक्के जीएसटी लागणार आहे.तर काही वस्तूंवरील जीएसटी हा शून्य टक्के करण्यात आला आहे.
बुधवारी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या 56व्या बैठकीत 2,500 रुपयांच्या पर्यंतच्या पादत्राणे आणि कपड्यांना 5% जीएसटी स्लॅबमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत फक्त 1,000 रुपये पर्यंतच्या वस्तूसाठी हा दर लागू होता, तर त्यावरील वस्तूंसाठी 12% कर लागायचा.
या निर्णयामुळे 2,500 रुपयार्यंतचे फुटवेअर आणि कपडे स्वस्त होतील.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री उपस्थित होते.
बैठकीत 12% आणि 28% चे स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्लॅबमधील बहुतेक उत्पादने अनुक्रमे 5% आणि 18% स्लॅबमध्ये समाविष्ट केली जातील.