जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांचे हल्ले वाढले
1 min read
बेल्हे दि.३०:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गुळुंचवाडी येथील घोडके वस्तीवर बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांत बिबट्याने एकाच घरात दोनदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून, वनखात्याकडे वारंवार तक्रार करूनही पिंजरा लावण्याकडे दुर्लक्ष केले जात
असल्याचा आरोप रहिवासी सागर जाधव यांनी केला आहे. ‘घरातील एखाद्या सदस्याचा जीव गेल्यावरच खाते जागे होणार का?’ असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. या संदर्भात माहिती देताना सागर जाधव असे म्हणाले की, बिबट्याने त्यांच्या बंगल्याच्या ७ फूट उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून आत येऊन
दोन वेळा हल्ला केला आहे. यापूर्वी झालेल्या हल्ल्यात त्यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता, ज्यात तो गंभीर जखमी झाला होता आणि त्याला जवळपास ५३ टाके पडले होते. जाधव यांनी सुमारे ४० ते ५० हजार रुपये खर्च करून त्याचे प्राण वाचवले असून नुकत्याच झालेल्या दुसऱ्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून,
त्यात बिबट्या स्पष्ट दिसत असून दोन्ही कुत्रे जाळीमध्ये बंद असल्यामुळे त्यांचा जीव बचावला. तसेच या भागात उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांचा वावर नेहमीच असतो. त्यामुळे रात्री अपरात्री व दिवसाही घराबाहेर पडणे लोकांना भीतीदायक वाटू लागले आहे.
वनखात्याकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसून सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत लोकांची बाहेर वर्दळ असते, अशा परिस्थितीत एखादी अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर शुक्रवार दिनांक 29 रोजी सदर ठिकाणी पिंजरा लावला असल्याची माहिती बेल्हे वनपाल नीलम ढोबळे यांनी दिली.
