अरुण गवळी १८ वर्षांच्या कारावासानंतर जेलबाहेर येणार; जामीन मंजूर

1 min read

मुंबई दि.२९:- शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे अरुण गवळी याच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.अरुण गवळीकडून वारंवार जामीनासाठी अर्ज केला जात होता. अखेर सुप्रीम कोर्टाकडून त्याला जामीन मंजूर झाला आहे. अरुण गवळीने विविध कारणास्तव जामीनासाठी अर्ज केला होता. पण कोर्टाने अनेकदा जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर आता सुप्रीम कोर्टाने अरुण गवळीचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची घाटकोपरमध्ये 18 वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. कमलाकर जामसंडेकर यांची घाटकोपरमधील त्यांच्या राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कमलाकर जामसांडेकर आपली रोजचे कामे आटोपून घरी आले होते. ते घरी टीव्ही पाहत होते. याचवेळी अचानक गुंड त्यांच्या घरात शिरले आणि त्यांनी कमलाकर यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात कमलाकर यांचा मृत्यू झाला होता. संबंधित हत्येची घटना ही 2 मार्च 2007 रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली होती.अरुण गवळी एका दुसऱ्या प्रकरणात नागपूर जेलमध्ये होते. त्यांना मुंबई हायकोर्टाने काही अटीशर्तींच्या अधीन राहून जामीन मंजूर केला होता. पण कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात त्यांना जामीन मिळत नव्हता. अखेर सुप्रीम कोर्टाकडून त्यांना आज जामीन मंजूर झाला आहे. यामुळे आता अरुण गवळी तब्बल 18 वर्षांनी जेलमधून बाहेर येणार आहे. कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणामुळे मुंबईत मोठी खळबळ उडाली होती. त्या काळात या हत्येच्या घटनेची प्रचंड चर्चा झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास केला होता. या प्रकरणात अरुण गवळीला अटक करण्यात आली होती. कोर्टाने अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. विशेष म्हणजे कोर्टाने हत्या घडली त्यावेळी अरुण गवळी हा आमदार होता. एका आमदाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची ती पहिली वेळ होती. या प्रकरणी गेल्या 18 वर्षांपासून अरुण गवळी हा जेलमध्ये आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!