पुणे जिल्ह्यात तब्बल २ लाख ४ हजार बोगस लाडक्या बहिणी; कारवाई होणार:- मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील
पुणे दि.२८: – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उठविणाऱ्यांविरोधात सरकारने राबविलेल्या शोधमोहिमेत पुणे जिल्हा परिषदेच्या ५४ महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा अहवाल पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून पाठविला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना असताना या कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. याबाबत आम्ही आवाहन केल्यानंतरही कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे संबंधित महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात तब्बल २ लाख ४ हजार बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्या आहेत. त्यातच पुणे जिल्हा परिषदेच्या ५४ महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. याबाबत राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाकडून एका आदेशाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविले आहे.
त्यानुसार आता लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. सरकारी योजनेचा लाभ घेऊ नये याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच कोणी लाभ घेतला असेल, तर त्याबाबत माहिती देण्यासाठी मुदतही देण्यात आली होती. त्यामुळे आता दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
