गणेशोत्सवासाठी जुन्नर तालुक्यातील बाजारपेठा सजल्या
1 min read
जुन्नर दि.२५:- लाडक्या बाप्पांच्या स्वागताचे वेध सर्वांनाच लागले आहेत.दरम्यान गणरायाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू असून जुन्नर तालुक्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. बाप्पांचा बडेजाव करण्यासाठी सजावटीच्या वस्तू, कृत्रिम फुले, माळा, मखर, पडदे यासह गौरीच्या दागिन्यांना मागणी वाढली आहे.
तर छोट्या दिव्यांच्या माळा, क्रिस्टल व चायनीज मालाचा झगमगाट दिसून येत आहे. त्यातच वीकेंडचा मुहूर्त साधत नागरिकांनी बाजारपेठत मोठी गर्दी केली आहे.गणेश मंडळांबरोबरच घरगुती स्वरुपातही मोठ्या प्रमाणात बाप्पाची सजावट केली जाते. आकर्षक विद्युतमाळा आणि मखरांनी किमतींमध्ये वाढ झाली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत मखर खरेदीला चांगली मागणी असून १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.तर सजावटीच्या वस्तू, लाइटच्या माळा आणि थर्माकोलपासून बनविलेली मंदिरे यांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. मखर ४०० ते ६००० रुपये, प्लास्टिक फुले ९० ते ५०० रुपये, हार ६० ते ३०० रुपये,
छोटी कलात्मक झाडे ३० ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर गौराईच्या मुखवट्यांची किंमतही गतवर्षीपेक्षा वाढली आहे. एलईडीमधील विद्युतमाळा लक्ष वेधून घेत आहे. तर, विविध आकार आणि प्रकारातील मखरी गणेशभक्तांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामध्ये चौरंग, मूषकवाहक रथ, सिंहासन, कमळ यासारख्या मखरांना विशेष मागणी आहे.
