खेडमध्ये धक्कादायक घटना; पत्नीच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
1 min read
राजगुरुनगर दि.२५:-खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे काल दुपारी एका ३३ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी आणि व्हॉट्सपवर शेअर केलेला संदेश यामुळे गावात खळबळ उडाली.
मृत तरुणाचे नाव भीमा बबन रेणके (वय ३३, रा. राक्षेवाडी) असे आहे.सिद्धेश्वर मंदिराजवळ त्याने दुपारी तीनच्या सुमारास गळफास घेतला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत नातेवाईकांनी थेट खेड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
मृताच्या चिठ्ठीत तसेच व्हॉट्सप संदेशात पत्नीच्या प्रियकराकडून धमक्या येत होत्या, तसेच त्याला साथ देणाऱ्या आणखी एका व्यक्तीचा उल्लेखही स्पष्टपणे करण्यात आला आहे. रेणके आत्महत्या करण्यापूर्वी याबाबत फिर्याद देण्यासाठी खेड पोलीस ठाण्यात आले होते,
मात्र पोलिसांनी केवळ ‘समज काढून’ परत पाठवले, अशी गंभीर माहिती नातेवाईकांनी दिली. नातेवाईकांनी ठाम भूमिका घेतली आहे की, ‘जोपर्यंत पत्नी, तिचा प्रियकर आणि संबंधित व्यक्तींना अटक होत नाही,
तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही तसेच अंत्यसंस्कार करणार नाही.’ ठाणे अंमलदार मोहन अवघडे यांनी सांगितले की, आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची टीम रवाना झाली आहे.
