बिबट्याच्या हल्यात दोघे गंभीर; पाळीव कुत्र्यांनी बिबट्याला केले ठार

1 min read

वडगाव कांदळी दि.२४:- वडगाव कांदळीतील वस्तीवर मुक्कामी असलेल्या मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. यावेळी बिबट्याला प्रतिकार करत असताना बिबट्याने दोन मेंढपाळांवर हल्ला करून जखमी केली आहे तर याच मेंढ्यांच्या वाड्यावर असलेल्या धनगरांच्या चार पाळीव कुत्र्यांनी बिबट्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्या ठार झाला. ही घटना शुक्रवारी ( दि.२२) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वडगाव कांदळी येथील भुजबळ वस्ती या ठिकाणी घडली. वडगाव कांदळी येथील भुजबळ वस्ती या ठिकाणी सावळेराम करगळ यांचे पत्र्याचेशेड असून त्या ठिकाणी मेंढयाचा कळप मुक्कामी होता. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन बिबटे मेंढ्यांवर हल्ला करण्यासाठी आले होते. त्यावेळी ही बाब संतोष सावळेराम करगळ याच्या लक्षात आल्यामुळे त्याने बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला यावेळी बिबट्याने संतोष याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी याला वाचवण्यासाठी त्याचे वडील सावळेराम करगळ हे पुढे गेले असता. बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला त्यानंतर त्यांच्या चार पाळीव कुत्र्यांनी आक्रमक होत बिबट्याला प्रतिकार केला. त्यानंतर बिबट्‌याने पळून जात असताना बिबट्याचा पाय तारेच्या जाळीला अडकला त्यावेळी कुत्र्यांनी बिबट्यावर हल्ला करून त्याचे लचके तोडले त्यामध्ये हा बिबट्या ठार झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!