विद्यानिकेतन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी टॅली व अँडव्हान्स एक्सेल प्रशिक्षण वर्ग सुरु
1 min read
साकोरी दि.२२:- विद्यानिकेतन पी. एम. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साकोरी (ता.जुन्नर) येथे इयत्ता १२ वी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी टॅली व अॅडव्हान्स एक्सेल यांसारख्या आधुनिक आणि व्यावसायिक सॉफ्टवेअरचे विशेष प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहेत.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणाऱ्या कौशल्यांचे प्रशिक्षण देणे आहे.हा उपक्रम शाळेतील इकोनॉमिक्स आणि सेक्रेटेरियल प्रॅक्टिसचे शिक्षक इमरान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना टॅली ERP मधील अकौंटिंग,GST व्यवस्थापन, तसेच एक्सेलमधील डेटा अॅनालिसिस, रिपोर्टिंग, फॉर्म्युले आदी बाबतीत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह सखोल माहिती दिली जात आहे.या उपक्रमाविषयी बोलताना प्राचार्य रमेश शेवाळे म्हणाले, “आजच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रम मर्यादित ज्ञान न घेता,
व्यावसायिक व तांत्रिक कौशल्येही आत्मसात करणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.”संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग साळवे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत असे उपयुक्त शिक्षण पुढेही देण्याचा संकल्प व्यक्त केला.
