अहिल्यानगर हादरले;फर्निचरच्या दुकान व घराला आग; पाच जणांचा मृत्यू
अहिल्यानगर दि.१८: – नेवासा फाटा येथे फर्निचर दुकानाला आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. १७) मध्यरात्री घडली. या घटनेने स्थानिकांमध्ये शोककळा पसरली आहे. दुकानातील लाकडी फर्निचर आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने रौद्ररूप धारण केले.
नेवासा फाटा कॉलेज परिसरातील कालिका फर्निचर दुकानाला रात्री १ च्या सुमारास अचानक आग लागली. दुकानाच्या मागील बाजूस राहणाऱ्या मयूर रासने यांच्या कुटुंबाला या आगीने वेढले. आगीचा भडका इतका तीव्र होता की, कुटुंबियांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
या दुर्घटनेत मयूर अरुण रासने (वय ३६), त्यांची पत्नी पायल (वय ३०), त्यांचे दोन मुलं अंश (वय ११), चैतन्य (वय ६) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय ८५) यांचा गुदमरून मृत्यू झाला. मयूर यांचे वडील अरुण रासने आणि त्यांच्या पत्नी मालेगाव येथे नातेवाइकांकडे गेले असल्याने बचावले.
