नळवणेचे धनंजय शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत सरचिटणीस पदी निवड
1 min read
नळवणे दि १८:- जुन्नर तालुक्यातील नळवणे गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते धनंजय रामकृष्ण शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये ”राज्य सरचिटणीस तसेच राज्य संयोजक (रोजगार विभाग)” या महत्त्वपूर्ण पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.
धनंजय रामकृष्ण शिंदे हे मागील ४ दशकांपासून देशभरात विविध शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, शहरी – ग्रामीण भागातील गरीब तथा वंचित समूह, विद्यार्थी व बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत आहेत.
त्यांनी युवक -शेतकरी आंदोलनापासून, सीएए-एनआरसीविरोधी आंदोलन, सहकार चळवळीतील भ्रष्टाचार तसेच स्पर्धा परीक्षा प्रक्रियेतील घोटाळ्याविरोधात लढा देत महाराष्ट्रातील युवक व शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमी अग्रस्थानी मांडले आहेत. गेली अनेक वर्षे विशेषतः बेरोजगार तरुणांना न्याय मिळावा,
रोजगारनिर्मितीला गती मिळावी आणि युवकांना सक्षम व्यासपीठ मिळावे यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. नियुक्तीबद्दल बोलताना मा. धनंजय रामकृष्ण शिंदे म्हणाले
“माझ्या जुन्नर तालुक्याच्या मातीत रुजलेले संस्कार, बालपणापासून अनुभवलेले संघर्ष आणि आप्तेष्ट, नातेवाईक,
मित्रपरिवार व नळवणे तसेच राजुरी ग्रामस्थ बांधवांचा आशीर्वाद आणि माझ्या आजोबांनी केलेल्या सहकार क्षेत्रातील मूलभूत कार्याचा वारसा ह्याच बळावर मला ही जबाबदारी मिळाली आहे. आता महाराष्ट्रातील जनतेच्या हक्कांसाठी व न्यायासाठी सातत्याने व अधिक जोमाने कार्यरत राहणार आहे.”
राजूरी गावातील ”श्री गणेश सहकारी दुध उत्पादक संस्था मर्यादित”, या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक कै. नारायण विठोबा घंगाळे यांचे मा. धनंजय रामकृष्ण शिंदे हे नातू आहेत.
प्रदेश काँग्रेस कमिटीमार्फत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी ही जुन्नर,आंबेगाव,शिरूर, नगर, पारनेर तालुके तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या हक्कांची चळवळीला बळ देणारी ठरणार असल्याचा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
