व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल येथे कृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला जल्लोषात संपन्न

1 min read

वडगाव कांदळी दि.१६:-विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, वडगाव कांदळी (ता.जुन्नर) येथे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सव भक्तिमय वातावरणात व जल्लोषात संपन्न झाला. संपूर्ण शाळा रंगीबेरंगी सजावटीने नटली होती. तर भव्य मैदानात गोकुळातील आनंदोत्सव अनुभवायला मिळत होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी वृंदा गणिगा आणि आराध्या हाडवळे यांनी ऊर्जस्वल व उत्साही शब्दांत केले.श्रीकृष्ण जन्माष्टमीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व देविका बढे हिने आकर्षक पद्धतीने सांगितले.तिने विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधत श्रीकृष्णाच्या बाललीलांचा गोड सहवास सर्वांना अनुभवायला लावला.त्यानंतर इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या भव्य मैदानावर आकर्षक आणि कलात्मक सजावट केलेली दहीहंडी उभारण्यात आली. सजावटीत सर्व महिला शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले. बालगोपालांनी शिक्षकांच्या मदतीने पिरॅमिड स्वरूपात थर रचून दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी इयत्ता पहिली ते पाचवीसाठी स्वतंत्र दहीहंडी, तर इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी दहीहंडी सजवून दोन्ही गटांना हंडी फोडण्याचा रोमांचक अनुभव देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान कृष्णकन्हैयाच्या बाललीलांचे नृत्य व गाणी सादर करून विद्यार्थ्यांनी रंगत वाढवली.गोपाळकाला सोहळ्यात शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सक्रिय सहभाग घेतला. मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी विद्यार्थ्यांसोबत आनंद व्यक्त करत एकतेचा,उत्साहाचा आणि भक्तीभावाचा संदेश दिला. उत्सवाच्या नियोजनासाठी शाळेच्या समन्वयिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, सर्जनशीलता, परंपरेची जपणूक आणि आनंदोत्सवाचा खरा भाव जागृत झाला. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, भक्ती आणि सामूहिक सहभाग यांचा सुंदर संगम ठरला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सीईओ दुष्यंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!