जयहिंद कॉलेजमध्ये सायबर सुरक्षिततेवर कार्यशाळा व नवीन क्लबांची स्थापना
1 min read
कुरण दि.१०:- येथील जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे सायबर सुरक्षितता क्षेत्रातील व्यावहारिक प्रशिक्षण आणि संस्थात्मक उपक्रमांना चालना देण्यात आली. दिनांक ०७ ते ०८ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित “सायबर सिक्युरिटी अॅवेयरनेस अँड हँड्स-ऑन वर्कशॉप” यशस्वी झाली.
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी OWASP सायबर स्टुडंट चॅप्टर आणि Cyber Sentinel क्लब या दोन विद्यार्थी संघटनांचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळेमध्ये २२०हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अमेरिकन सायबर सुरक्षा HackerOne चे तज्ञ श्रीमंत मोरे आणि पवन तांबे यांनी प्रात्यक्षिकेसहित व्यावहारिक प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमासाठी HackerOne ने ३०० अमेरिकन डॉलर्स (सुमारे ₹२५,०००) ची प्रायोजक मदत पुरवली. उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ,संचालोका डॉ. शुभांगी गुंजाळ, सीईओ डॉ. डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल, संगणक विभागप्रमुख डॉ. आनंद खत्री तसेच HackerOne प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रो. अभिषेक बांगर (संगणक विभाग) यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना सायबर हल्ले,डेटा संरक्षण आणि नैतिक हॅकिंगचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाले. नवस्थापित OWASP स्टुडंट चॅप्टर आणि Cyber Sentinel क्लब यामार्फत विद्यार्थी सुरक्षा संशोधन, स्पर्धा व जागरूकता कार्यक्रमांना चालना देणार आहेत.
संस्थेच्या वतीने जितेंद्र गुंजाळ यांनी सांगितले: “सायबर सुरक्षितता ही आजची गरज आहे. हे दोन क्लब आणि HackerOne सारख्या जागतिक भागीदारांमुळे आमचे विद्यार्थी या क्षेत्रातील नेतृत्त्व भूमिकेत उदयास येतील.”
