बेल्ह्यातील सातबाऱ्यात फेरफार करून जमिनीची विक्री;नारायणगावात पाच जणांवर गुन्हा

1 min read

नारायणगाव दि.९:- बेल्हे(ता. जुन्नर)येथील शेत जमिनीच्या ७/१२ उताऱ्यामध्ये फेरफार करून नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत करून विक्रीकेल्याप्रकरणी दुय्यम निबंधक अर्चना शैलेंद्र पाकळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जमिनीची विक्री करणाऱ्या पाच जणांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोन जणांना नारायणगाव पोलीसांनी अटक केली असून आरोपींना जुन्नर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. अशी माहिती फौजदार जगदेव पाटील यांनी दिली.याप्रकरणी शेत जमिनीची विक्री करणारे विमल मुरलिधर विश्वासराव (वय ८४), रंजना शंकर गोरे, (वय ४६, दोघीही रा. कुंभार आळी, पाबळ, ता. शिरूर), जयश्री अनिल सोलवंकर, (वय ४२ रा. श्रीकृष्ण कॉलनी स्वामी समर्थ मंदिराजवळ, थेरगाव, डांगे चौक, चिंचवड), सतिश यशवंत कुंभार (वय ३८), संतोष यशवंत कुंभार (वय ४० दोघेही रा. सदाशिव पेठ, शास्त्री रोड, कुंभारवाडा, पुना हॉस्पिटलजवळ, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून यापैकी संतोष कुंभार व सतिश कुंभार यांना ५ ऑगस्ट २०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.बाबत माहिती अशीः आरोपींनी बेल्हे रोजी येथील त्यांचे नावावरील सामाईक खाते क्रमांक ३७३ मधील जमीन गट क्र. ११५/१ या गटाचे सामाईक अविभक्त क्षेत्र विक्री करण्याकरीता १७ एप्रिल २०२३ नारायणगाव येथील दुय्यम निबंध कार्यालयात खरेदीखत करून शेत जमिनीची विक्री केली होती. ही खरेदी दस्त बनविताना ज्या जमिनीची खरेदी करावयाचे आहे. त्या जमिनीचे डिजिटल ७/१२ उताऱ्याचा वापर केला होता. सदरच्या जमिनीची विक्री करून खरेदी दस्त बनविल्यानंतर त्याचे अवलोकन केले असता सदर दस्तास जोडलेला ७/१२ गाव नमुना व संगणकीकृत ७/१२ नमुना यांच्या पिकपाहणीमध्ये तफावत असल्याचे तपासणीत दिसून आले.दरम्यान, ग्राम महसूल अधिकारी यांनी या संबंधीत दिलेला अहवाल पाहून खरेदी खतास जोडलेला सातबारा उतारा याची पडताळणी दुय्यम निबंधक अर्चना पाकळे यांनी केली असता सुनील विश्वासराव यांनी केलेल्या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य काढून आले. यामुळे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्या आदेशानुसार दुय्यम निबंधक पाकळे यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!