व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी भावबंध, आपुलकी आणि संस्कारांची केली जपणूक
1 min read
वडगाव कांदळी दि.८:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, वडगाव कांदळी येथे रक्षाबंधन हा पवित्र सण भावभावनांनी, परंपरांनी आणि आपुलकीने नटलेल्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी शाळेच्या प्रार्थनेनंतर ‘रक्षाबंधन’ या सणाचे महत्त्व सांगणारे
विशेष भाषण इयत्ता सातवी अ मधील कुमारी. वृंदा गणिगा या विद्यार्थिनीने दिले; भावा – बहिणीच्या अतूट प्रेमाचे महत्त्व ऐतिहासिक कथेद्वारे तिने विद्यार्थ्यांना उत्तम रीतीने पटवून दिले आणि विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराद्वारे संवाद देखील साधला. त्यानंतर सर्व इयत्तांमध्ये भावंड प्रेम, सुरक्षा आणि नात्यांची गोडी अधोरेखित करणारे कार्यक्रम पार पडले.
शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या सहाध्यायी विद्यार्थ्यांना राखी बांधून त्यांच्याविषयी प्रेम, विश्वास आणि शुभेच्छा व्यक्त केल्या; तर विद्यार्थ्यांनीही त्यांना सुंदर भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. काही इयत्तांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्येही राखी बांधून स्नेहबंध दृढ करण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या हस्तकला राख्या, शुभेच्छा पत्रके याद्वारे तर प्री – प्रायमरी विभागातील शिक्षकांनी शुभचिंतन फलक यांद्वारे आपली सर्जनशीलता दाखवली. काही विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन गीत, कविता सादरीकरण करून कार्यक्रमात रंग भरले.
मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे सामाजिक, भावनिक व सांस्कृतिक महत्त्व सांगितले आणि भविष्यात बहीण-भावाचे नाते प्रेम, विश्वास आणि जबाबदारीने जपावे असा संदेश दिला.प्री-प्रायमरी विभागातही उत्सवाचे वेगळेच रंग पाहायला मिळाले.
नर्सरी ते सीनिअर केजी वर्गातील चिमुकल्यांनी एकमेकांना राखी बांधून निखळ प्रेम आणि सौंदर्यपूर्ण संस्कारांची अनुभूती दिली. सर्वच शिक्षकांनी चिमुकल्यांबरोबर रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका
तसेच समन्वयिका जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या मनात प्रेम, आपुलकी, जबाबदारी व मूल्यांचे बीज पेरले गेले हे विशेष. या कार्यक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सीईओ दुष्यंत गायकवाड यांचे विशेष प्रोत्साहन लाभले.
