राज्यातील अनेक भागात आज पावसाची शक्यता; १७ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
1 min read
मुंबई दि.६:- राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आजपासून राज्यातील काही भागांत पुन्हा एकदा पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने आज बुधवारी राज्यातील १७ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे, शेतीत आणि दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता पुन्हा पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.हवामान तज्ज्ञांनुसार, मान्सूनच्या विश्रांतीच्या काळात स्थानिक हवामान प्रणाली विकसित झाल्यामुळे
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण होत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. विशेषतः, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो.
नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः ज्या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तेथील लोकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे.
