पुण्यात ड्रेनेज लाइनचे काम करताना अचानक मातीचा ढिगारा अंगावर कोसळला; गुदमरून कामगाराचा मृत्यू; तिघेजण जखमी
1 min read
पुणे दि.५:- पुण्यातील नांदेड सिटीतील कलाश्री सोसायटीसमोर नांदेड सिटी कंपाउंड वॉलच्या बाहेरील बाजूस महापालिकेच्या ड्रेनेजलाइनच्या कामादरम्यान मोठा अपघात घडला आहे. खड्ड्यात उतरून काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर मातीचा ढिगारा अचानक कोसळला, त्या ढिगाऱ्याखाली चार कामगार गाडले गेले.
अग्निशामक दलाने त्यांना बाहेर काढले, मात्र त्यातील एकाचा गुरमरून मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, पुणे महापालिकेच्या जायका प्रकल्पाअंतर्गत नांदेड सिटी येथील कलाश्री सोसायटीच्या वॉल कंपाउंडला लागून ड्रेनेजलाइनचे काम सुरू होते.
त्या कामासाठी जेसीबीने साधारण आठ फुटापर्यंत खड्डा खोदण्यात आला होता. खोदलेल्या खड्ड्यातील माती, खड्ड्यातील मातीचा ढिगारा खड्ड्याच्या जवळच ठेवला होता. त्या खड्ड्यामध्ये चार कामगार पाइपलाइनचे काम करण्यासाठी उतरले होते.ते खाली बसून काम करत असतानाच अचानक मातीचा ढिगारा खड्ड्यात त्यांच्या अंगावर कोसळला.
खड्ड्याखाली चारही कामगार गाडले गेले. ही घटना आणखी एका कामागराच्या लक्षात येताच त्याने तातडीने अग्निशामक दलाला संपर्क केला. काही वेळात अग्निशामक दलाचे जवान तेथे पोहोचले. खड्डा पुन्हा उकरून चौघांना बाहेर काढले.
शेवटचा कामगार कन्नीराम प्रजापती याला बाहेर काढताना रात्रीचे साडेनऊ वाजले होते. तोपर्यंत दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर अन्य तीन कामगार जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
