राज्यात पावसाचा जोर कमी

1 min read

मुंबई दि.३:- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर आता कमी झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे,तर बहुतांश ठिकाणी वातावरण ढगाळ राहील. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये वादळी वारे विजांसह पाऊस पडेल.गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होता, पण आता तो कमी झाला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता असून, उर्वरित पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली आहे. मुंबईतही पावसाचा जोर कमी झाला असून, आकाश ढगाळ राहील. आज विदर्भ आणि कोकण विभागातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे या भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही. मात्र विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होईल. त्यानंतर पावसाचा जोर कायम राहील. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहील. याचबरोबर महिन्याच्या अखेरीस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यातील अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात सरासरी इतका पाऊस पडेल असे हवामान विभागाने सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!