तहसीलदार ज्योती देवरे पुन्हा अहिल्यानगरमध्ये; निवडणूक शाखेत नियुक्ती
1 min read
अहिल्यानगर दि.२:- पारनेर तालुक्यात खासदार निलेश लंके यांच्याशी चार वर्षांपूर्वी वाद झालेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांची पुन्हा अहिल्यानगरमध्ये बदली झाली आहे. त्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेचे काम पाहतील. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत.
पारनेर तालुक्यात चार वर्षांपूर्वी कोरोना काळात तहसीलदार ज्योती देवरे व तत्कालीन आमदार निलेश लंके यांच्यात वाद झाला होता. हा वाद राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. पारनेर तालुक्यातील वाळू तस्करीवरील कारवाई व कोविड सेंटर या विषयावरून हे वाद झाले होते. त्यानंतर ज्योती देवरे यांची बदली करण्यात आली होती.
तहसीलदार देवरे या नुकत्याच पुणे जिल्ह्यातील खेड येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. तेथेही त्या वादग्रस्त ठरल्याने त्यांची बदली करण्यात आली. त्यांना काल (ता. ३१) अहिल्यानगर जिल्ह्यातील निवडणूक शाखेत बदलीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार देवरे या निवडणूक शाखेचे काम पाहणार आहेत. जिल्ह्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत.
