लोक कलावंतांची होतेय घुसमट; आमच्या भावना जाणणार कोण?:- मंगल वाघमारे

1 min read

बेल्हे दि.३०:- कलावंत म्हटले की मग त्याची प्रशंसा करण्यात आपण कुठेही कमी पडत नाही,आपल्याला आनंद देण्यासाठी ज्यांनी आपली सर्व सुख दुःख पणाला लावलेली असतात अशा लोक कलावंतांची भूमिका जाणण्यासाठी कधी कुणी सरसावत आहे का? शासन आणि राज्यकर्ते कायदे करूनही त्याचे प्रत्यक्ष पालन होताना या कलावंतांना किती अडचणींना सामोरे जावे लागते याचाही विचार होणे गरजेचे आहे.खरोखर किती योजना आणि किती सुविधा त्यांच्याकरीता अंमलात येतात हे पडताळण्याची आता वेळ आलीय, लोक कलावंतांची घुसमट होत असून. आमच्या भावना जाणणार कोण? अशी भावना जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध लावणी गायिका मंगल वाघमारे यांनी केली आहे. यात्रा जत्रांचा हंगाम साधारण वर्षातून ४५ दिवसांचा असतो त्यातही स्पर्धा वाढल्या आहेत. रसिक प्रेक्षकांना मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा सारखा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र जिवंत कला जोपासणाऱ्या तमाशांना देखील रसिक पसंती देत असतात. त्यातल्या त्यात पंचेचाळीस दिवसाच्या यात्रा जत्रांच्या हंगामात आम्हाला १५ सुपार्‍या मिळतात. तर कधी दहा देखील एका दिवसाला सत्तर हजार ते दोन लाखापर्यंत सुपारी मिळते.एवढ्यात कसा बसा खर्च भागतो असेही हे कलावंत सांगतात.त्यांच्या ताफ्यात फड मालक,कलाकार,वगसम्राट,गण- गवळण, गाणी, मुजरा, लावणीमालकीण /मालक मॅनेजर, नृत्यांगना, ढोलकी मास्टर, पेटी मास्तर, गायिका, गायक, कवी, गाड्या, ड्रायव्हर, स्वयंपाकी असा भलामोठा म्हणजे कमीत कमी १३० लोकांचा हा ताफा असतो. प्रत्येकामागे कुटुंबात दोन चार लोकं अवलंबून असतात. साधारण फक्त तमाशा कलावंतांच्यावर जर पाच सहाशे लोकं उदरनिर्वाह करीत असतील आणि या कलावंतांना कौटुंबिक जबाबदारी पार पाडायची असेल तर त्यांच्या हाताला वर्षभर काम असणे गरजेचे आहे. मात्र असे होत नाही पर्यायी या कलावतांना थिएटर सारखा मार्ग निवडून सर्वांच्या हाताला काम मिळते. सांस्कृतिक कला केंद्र सारख्या विषयावर शासनाने देखील या कलावंतांना परवानगी देऊन प्रोत्साहित केलेले आहे.शासनाच्या पुर्व परवानगीने राज्यभरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक कला केंद्र उभारलेली आहेत. यामुळे का होईना या लोक कलावंतांना आपला उदरनिर्वाह सुरुळीत करता यावा आणि लोक कला जिवंत रहावी हा या मागचा हेतू असावा.मात्र येथे काम करणाऱ्या मुली आणि महिला देखील उपेक्षित आहेत की काय असा सवाल उपस्थित होत आहे. या महिलांकडे बघण्याची नजर अजूनही बदललेली नसल्याने त्यांना स्वातंत्र्य वाटत नाही त्याही समाजाचा घटक म्हणून त्यांना समाजाने आपलेसे करावे अशा भावना त्यांच्यातून व्यक्त होत असतात. त्यांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे विसरता कामा नये.

चौकट
सावरता सावरता वर्षे लोटली 

कोरोना काळात झालेल्या लॉक डाऊनमुळे तमाशाचा संपूर्ण हंगाम बुडाला.परिणामी तमाशाचे फड,त्यात काम करणारे कलावंत त्यांचे कुटुंबीय आदींना आर्थिक अडचणींचा सामना आजही करावा लागत आहे.त्यांच्यासमोर प्रपंच चालविण्याचे मोठे संकट उभे राहिले.या काळात या गंभीर प्रश्नाकडे शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले होते. आर्थिक अडचणीत असलेल्या फडमालकांना आर्थिक आधार दिला नाही तर महाराष्ट्राची परंपरा असलेली ही लोककला धोक्यात येईल.
——-
चौकट

घुंगरू आणि ढोलकीसोबत जगणं

तमाशालाच पंढरी मानणारे हे कलावंत
खरं तर यातील नर्तिका कळत्या सवरत्या झाल्यावर एकदा का पायी घुंगरू बांधले… की आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांच्या तालावर नाचवतात… एकदा का ओठ रंगवले की सगळं दुःख काळजात दडपून टाकायची आणि लावणीचा ठेका पकडायचा… ढोलकीवर थाप पडली की शिट्ट्या पडेपर्यंत फक्त बेभान होऊन फक्त नाचत राहायचं.सगळं आयुष्य वेचायचं ते या लोककलेची सेवा करण्यात. लग्न वगैरे काही भानगडच नाही.’शोधीत एकदा घटकेचा विश्राम,भांगेत पेरुनी तुळस परतला शाम…’तमाशा कलावंतांसारखे अनेक कलावंत सादरीकरण करीत समाजप्रबोधन करतात. मात्र या सगळ्या अडीअडचणीतून शालेय शिक्षण घेण्यास त्यांना वेळच नाही आणि तशी आर्थिक किंवा कौटुंबिक परिस्थिती देखील नाही अशा वेळी तमाशा कलावंतांसारखे भटक्या समाजातील बहुतांशी घटक शिक्षणापासून वंचित राहत आहे. त्यांना शिक्षणाची गरज असताना त्यांच्या अडाणीपणामुळे त्यांना शासनाच्या कोणत्याही योजना माहित नाहीत त्यांना सध्या काय मिळतं आणि किती यातच हा समाज गुंतलेला आहे.अशांना खरं तर आपणच हात देण्याची गरज आहे.
——–
प्रतिक्रिया

महाराष्ट्राची लोककला सातासमुद्रापार जाऊनही….

“महाराष्ट्राची लोक कला मयदित न राहता सातासमुद्रापार गेली असताना तिचा उगम असणाऱ्या लोककलेला लावणीला दर्जा देण्यास आपण कमी पडतो आहे का? असा देखील आत्मीक सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या लावणीला दर्जा देण्यासाठी ही कला जिवंत ठेवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत.”

मंगल वाघमारे, लावणी गायिका जुन्नर
——

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!