मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; १८-२० गाड्या एकमेकांवर धडकल्या; अनेकजण जखमी
1 min read
खोपोली दि.२७:- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात भीषण अपघात झाला आहे. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तब्बल १८ ते २० गाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या आहेत. या अपघातात अनेक गाड्यांचा चक्काचूर झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच अनेक प्रवासी देखील गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नेहमीच मोठी वर्दळ असते. हा भारतातील सर्वात व्यग्र द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. या मार्गावर दररोज सुमारे दीड लाख वाहने धावतात. शनिवारी रविवारी ही संख्या २ लाखांचा आकडा पार करते. ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस वाहतूक व्यवस्थेमध्ये आवश्यक बदल करीत असतात.
आजही प्रचंड मोठी वर्दळ लक्षात घेऊन पोलिसांनी नियोजन केले होते. परंतु खंडाळ्यानजीक झालेल्या अपघाताने संपूर्ण नियोजन कोलमडून गेले आहे. जवळपास ५ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.लोणावळा खंडाळा घाटातून खाली उतरल्यानंतर दत्ता फूड मॉलच्या समोर हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार १८ ते २० वाहने एकमेकांवर आदळली. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तब्बल १८ ते २० गाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या. कंटनेरने जोरदार वेगात वाहनाला धडक दिल्याने अनेक गाड्यांना एकाच वेळी धडक बसली. अपघातात तीन वाहनांचा अगदी चक्काचूर झाला आहे.
अपघातात काही जणांना दुखापत झाल्याची माहिती देखील मिळत आहे. अपघातानंतर जखमींना मदत करण्यासाठी प्रशासनाची धावाधाव झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने एकमेकांवर आदळल्याने अपघातग्रस्त वाहनांच्याच रांगा लागल्या होत्या.
त्यामुळे दुसऱ्या वाहनांना अपघातग्रस्त वाहनांना ओलांडून जाता येत नसल्याने जवळपास चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर नागरिकांची प्रचंड मोठी गर्दी आहे.
