राजगुरूनगर येथे गुटख्यासह ४४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दोघांना अटक

1 min read

राजगुरूनगर दि.२५:-खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सांडभोरवाडी गावाजवळ पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या जुन्या खेड घाट रस्त्यावर मंगळवारी (दि. २३) रात्री पावणेबारा वाजता खेड पोलिसांनी मोठी कारवाई करत एक कंटेनर, एक पिकअपसह सुमारे ४४ लाख ९ हजार २०० रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसालासाठा जप्त केला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार झाला आहे.तुषार शांताराम बंदावणे (वय ३८, रा. बंदावणेशिवार, ता. खेड) आणि संदेश राजाराम ढमाले (रा. ढमालेशिवार, ता. खेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पिकअप गाडी (एमएच १४ एलबी ४६१५) च्या चालकाविरुद्धही तक्रार नोंदवण्यात आली आहे, ज्याचे नाव आणि पत्ता अद्याप अज्ञात आहे. खेडचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण म्हणाले की, खेड पोलिसांचे गस्ती पथक फिरतीवर असताना सांडभोरवाडी गावच्या हद्दीतील जुन्या खेड घाट रस्त्यावर तपासणी दरम्यान, एका टाटा कंपनीच्या लाल रंगाच्या कंटेनर (एमएच १४ एल बी २००१) आणि महिंद्रा बोलेरो पिकअपकमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा साठा वाहुन नेत असताना आढळला. हा साठा संदेश राजाराम ढमाले याच्या मालकीच्या कंटेनरमध्ये ठेवण्यात आला होता, तर तुषार बंदावणे आणि पिकअप चालक यांनी संगनमताने हा माल वाहतुकीसाठी ताब्यात घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!