मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणमधील चुकीच्या उड्डाणपुलाविरोधात महायुतीचा एल्गार

1 min read

मुंबई दि.२०:- मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील अपूर्ण आणि चुकीच्या नियोजनात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाविरोधात चिपळूणकरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत प्रांत कार्यालयापासून डाऊन दिशेला केवळ भिंतीसारखा बांधण्यात आलेला हा उड्डाणपूल शहराच्या सुरक्षिततेला आणि विकासाला गंभीर इजा पोहोचवणारा आहे, अशी संतप्त भावना शहरातील जनतेत आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षांमध्ये दिसून येत आहे.नागरिकांचा ठाम विश्वास आहे की, हा उड्डाणपूल बहादूर शेख ते कापसाळपर्यंत संपूर्णपणे व्हायला हवा. सध्याच्या अर्धवट आणि चुकीच्या रचनेमुळे चिपळूण शहराचे दोन्ही भाग विभक्त होण्याची शक्यता असून, प्रांत कार्यालयाच्या मागील डोंगररांगांमधून येणारे पाणी, नाल्यांचे प्रवाह, शासकीय कार्यालये, रुग्णालये, शाळा आणि लोकवस्ती थेट बाधित होणार आहे. याशिवाय चुकीच्या सर्कल, डायव्हर्जन आणि एप्रोच रोडमुळे पावर हाऊस आणि पागनाका परिसर अपघाती मृत्यूचे केंद्रबिंदू बनत चालले आहेत, अशी गंभीर चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोरदार आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली असून, आमदार शेखर सर निकम यांनी हा विषय राज्य सरकारकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आणि अधिवेशनातदेखील उपस्थित केला आहे. तसेच बौद्धवाडीकरिता तातडीचा अंडरपास तयार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी कापसाळपर्यंत पूल वाढवण्याच्या मागणीसाठी सुमारे 110 कोटींचे प्रस्तावित इस्टिमेट तयार करून हायवे प्रशासनाकडे सादर केल्याचे स्पष्ट केले. या मागणीचा पाठपुरावा महायुतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.यामध्ये सहभागी असलेल्यांमध्ये भाजपा शहराध्यक्ष शशी मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, अभ्यासू नगरसेवक विजय चितळे, माजी नगरसेवक किशोर रेडीज, आरपीआयचे मंगेश जाधव, समाजहिताचे मुद्दे मांडणारे रामदास राणे, समन्वयक उदय ओतारी, बापू काणे आदींचा सक्रिय सहभाग होता. आजच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला की, लवकरच एक उड्डाणपूल शिष्टमंडळ स्थापन करून हा विषय पालकमंत्री उदय सामंत, खासदार निलेश राणे व केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांच्याकडे सविस्तरपणे मांडला जाणार आहे. या बैठकीत पुढील सर्व राजकीय निवडणुका, विकास कामे, कार्यक्रम हे महायुतीच्या एकसंघ बळावरच लढवले जातील असे सर्व पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले. या बैठकीस महायुतीचे प्रमुख नेते,पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!