इराकमध्ये शॉपिंग मॉलला भीषण आग; 60 जणांचा मृत्यू; जेवताना, शॉपिंग करताना अनेक जण जिवंत जळाले

1 min read

बगदाद दि.१६:- इराकमधील अल-कुट शहरात असलेल्या शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत किमान ६० जणांचा मृत्यू झाला आहे. इराकची सरकारी वृत्तसंस्था आयएनएला प्रांताचे गव्हर्नर मोहम्मद अल-मियाही यांनी गुरुवारी याबद्दलची माहिती दिली.बगदादच्या आग्नेयला १६० किलोमीटर अंतरावर अल-कुट शहर आहे. रात्रीच्या सुमारास लागलेली आग पहाटेपर्यंत भडकलेली होती. पहाटे ४ पर्यंत रुग्णवाहिका जखमींना रुग्णालयांमध्ये पोहोचवत होत्या.जखमींमुळे रुग्णालयांमधील सगळे बेड भरले. डॉक्टरांच्या सु्ट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळ गाठून जखमींचे जीव वाचवले. बऱ्याच तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आली. आगीच्या कारणांचा तपास केला जात आहे. या दुर्घटनेनंतर प्रांतात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.एएफपी वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ज्या मॉलमध्ये आगीची घटना घडली, त्याचं उद्घाटन होऊन आठवडादेखील उलटलेला नाही. अवघ्या ५ दिवसांपूर्वीच मॉलचं उद्घाटन झालेलं आहे. आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागली. पण अवघ्या काही मिनिटांमध्ये आग अन्य मजल्यांवर पोहोचली. आगीनं रौद्ररुप धारण केलं आणि संपूर्ण मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. याआधी २०२३ मध्ये इराकच्या एका लग्न सोहळ्यात मोठी दुर्घटना घडली होती. विवाह समारंभ सुरु असताना लागलेल्या आगीत १०० जणांचा मृत्यू झाला होता, तर १५० जण जखमी झाले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!