देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर
1 min read
मुंबई दि.१७:- महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. देवेंद्र फडणवीस आज विधान परिषदेत बोलत होते.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांचा निरोप समारंभ आज सभागृहात पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या या ऑफरवर आता उद्धव ठाकरे काय बोलतील? याबाबत उत्सुकता आहे.
अंबादास दानवे यांचा आज निरोप समारंभ आहे. आमच्या शुभेच्छा आहेत.त्यांनी पुन्हा या समारंभात यावं. आल्यानंतर त्याच पदावर असं काही नाही. मी असं म्हटल्यावर हे म्हणतील की पळवापळवी करतोय म्हणून. उद्धवजी! आता उद्धवजी 2029 पर्यंत काही स्कोप नाही.
आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही. तुम्हाला इकडे यायचा स्कोप… विचार करता येईल. त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करु. पण आम्हाला तिकडे यायचा स्कोप हा उरलेला नाही”, असं देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले. अंबादास दानवे कुठेही असले तरी त्यांचा मूळ आत्मा हा हिंदूत्ववादी आहे.
त्यामुळे ते हा विचार सोडणार नाहीत. त्या विचाराच्या दिशेनेच ते सातत्याने काम करत राहतील. पुढचे विरोधी पक्षनेते कोण? असा प्रश्न निर्माण होईल. म्हणजे तुम्ही सोडवाल तो प्रश्न. तुम्ही म्हणाल ते करु आपण. इथे सभापती ठरवतील ते होतील आणि विधानसभेत अध्यक्ष ठरवतील ते होईल.
तुम्ही जे म्हणताय ते आम्हाला मान्यच आहे. पण अध्यक्ष आणि सभापतींना जे मान्य असेल ते सर्वांना मान्य असेल. मुख्यमंत्री कितीही मोठा असला तरी अध्यक्ष आणि सभापती जे सांगतील ते आपल्याला ऐकावच लागतं”, अशी फटकेबाजीदेखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने संबंधित वक्तव्य केलं की मस्करीत केलं ते आगामी काळात स्पष्ट होईल. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे संबंधित वक्तव्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतात? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपची अनेक वर्ष युती होती.
पण शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. पण आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्याने राज्याच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या हालचाली घडतील का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
