जाधवडीतील फरार चंदनतस्करास हायकोर्टाचा दणका
बेल्हे दि.१७: – जाधववाडी (ता.जुन्नर) येथील फरार चंदन तस्करास उच्च न्यायालयातही दणका दिला असल्याने आता तब्बल तीन महिन्यांपासून फरार असणाऱ्या आरोपीच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जुन्नर तालुक्यातील ओतूर वनपरीक्षेत्र हद्दीतील जाधववाडी येथून दि.६ मे रोजी चंदन लाकडाची अवैध वाहतूक होणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानुसार ओतूर वनपरिक्षेत्र पथकाने धाड टाकली असता चंदन लाकडाची अवैध वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.
यावेळी आरोपी लहु सोमनाथ धुळे (रा. जाधववाडी) हा फरार होण्यास यशस्वी झाला होता, त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, आरोपीच्या कारमधील चंदन लाकडाच्या तुकड्यांनी भरलेल्या ८ गोण्या एकूण वजन २०१.०५७ किलो, अवैध वाहतुकीसाठी वापरलेली कारसह अन्य असा १५ लाख ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
दरम्यान, फरार आरोपी धुळेने दि. ५ जून रोजी जुन्नर न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज दाखल केला होता; मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता.त्यानंतर फरार आरोपी धुळेने मुंबई उच्च न्यायालयात येथे धाव घेत दि. ११ जुलै रोजी पुन्हा अटक पूर्व जामीन अर्ज दाखल केला असता.
न्यायालयाने दि. १५ जुलै रोजी सुनावणी नेमली होती. या सुनावणीस ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी उपस्थित राहून सहायक सरकारी आभियोक्ता साळगावकर यांना गुन्ह्याचे गांभीर्य तसेच सर्व हकिकत सांगत वनविभागाच्यावतीने प्रभावीपणे बाजू मांडली.
उच्च न्यायालयाने निसर्ग संवर्धनास बाधा निर्माण होत असल्याचे निरीक्षण नोंदवून फरार आरोपी तसेच अन्य सहभागी आरोपीचा शोध घेणे आवश्यक असल्याने जामीन अर्ज दि. १५ जुलै रोजी फेटाळल्याने अवैध चंदन व्यापार्यांचे धाबे दणाणले आहेत.
