अनिल परबांकडून गद्दार उल्लेख, शंभुराज देसाई संतापले म्हणाले, बाहेर ये तुला दाखवतो; विधान परिषदेत जोरदार खडाजंगी

1 min read

मुंबई दि.१०:- विधानपरिषदेत आज वातावरण चांगलेच तापले. विरोधी बाकांवरील ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि महायुतीचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या जोरदार हमरीतुमरी झाली. मराठी माणसाच्या मुद्यावर बोलताना ही खडाजंगी झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या तुफानी शाब्दिक वादामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सभागृहातील वातावरण तापल्यानंतर अखेर सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुंबई आणि महानगर भागात आता मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास सुरू आहे. यामध्ये उभ्या राहणाऱ्या इमारतींमधील 40 टक्के घरे मराठी माणसांसाठी राखीव ठेवण्याची मागणी परब यांनी केली.सरकारने आता याबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. महायुती सरकारकडून शंभूराज देसाई यांनी उत्तर देताना ठाकरे गटाला लक्ष्य केले.तुम्ही मराठी माणसासाठी काही केलं नाही असा आरोप त्यांनी केला. तुमचं मराठी आणि मराठी माणसावरील प्रेम हे पुतणा मावशीचे प्रेम आहे. त्यावर परब हे संतापले आणि देसाई यांना प्रत्युत्तर देत सरकार काय करणार हे सांगा असे म्हटले. मात्र, शंभूराज देसाई यांनी परब यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू ठेवला. या दोन्ही नेत्यांमध्ये शा‍ब्दिक चकमक सुरू असल्याने सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले. अखेर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!