मातोश्री स्कुलमध्ये वारकरी दिंडीचे आयोजन; दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख होते:- किरण आहेर

1 min read

कर्जुले हर्या दि.५:-शाळेमध्ये आषाढी एकादशी व इतर सण समारंभ उत्साहात व भक्तिभावाने साजरे झाले पाहिजेत. अशा कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख होऊन संस्कारक्षम व जबाबदार नागरीक घडण्यास मदत होईल असे प्रतिपादन मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे सचिव किरण आहेर यांनी केले. ते येथील मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान संचलित मातोश्री ग्लोबल स्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या वारकरी दिंडीत सहभागी झाले होते.संस्थेच्या अध्यक्षा मिरा आहेर, कार्याध्यक्ष डॉ दिपक आहेर, संचालिका डॉ श्वेताम्बरी आहेर, शितल आहेर व खजिनदार बाळासाहेब उंडे आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले. या दिंडीत शाळेतील नर्सरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी कुर्ता, पायजमा, धोतर, टोपी, कपाळी गंध, हाती भगवे झेंडे व टाळ तसेच विद्यार्थीनींनी नऊवारी साड्या परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन मोठ्या भक्तिभावाने विविध भक्तीपर गीते गाऊन विठुरायाचा जयघोष केला. या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी विठल रुख्मिनीचा वेश धारण करून वातावरण भक्तिमय केले. विद्यार्थ्यांनी वासुंदे चौक व टाकळी ढोकेश्वर बाजारतळ येथे रिंगण करून विविध भक्तिगीते, तसेच ढोल ताशांच्या गजरात लेझीम व फुगडीचा फेर धरून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले अशी माहिती शाळेचे प्राचार्य सत्तार शेख यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिंडी प्रमुख विशाल डोळस, जुनिअर कॉलेजचे प्राचार्य राहुल सासवडे व त्यांचा सर्व स्टाफ, सुनील उंडे, प्रमोद चेमटे, अनिता औटी, संध्या निवडुंगे, सविता भांड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!