सभापती राम शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान बंदोबस्तात कसुर; पोलीस अंमलदार निलंबित
1 min read
अहिल्यानगर दि.२६:-विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यादरम्यान सुरक्षेच्या व्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळल्याने येथील जिल्हा विशेष शाखेतील पोलीस अंमलदाराला निलंबित करण्यात आले आहे.
संबंधित अंमलदाराने बंदोबस्ताची आवश्यक माहिती संबंधित पोलीस ठाण्याला वेळेत न दिल्यामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी त्यांचे निलंबन केले आहे. भगवान वाघुले असे निलंबित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सभापती शिंदे हे गेल्या शनिवार व रविवार (२१ व २२ जून) रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
शनिवारी त्यांनी अहिल्यानगरमध्ये मुक्काम केला होता, तर रविवारी नेवासा तालुक्यातील विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग निश्चित करण्यात आला होता.मात्र रविवारी ऐनवेळी त्यांच्या दौऱ्यात बदल होऊन ते सावेडीतील माऊली संकुल येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे ठरले.
या अचानक झालेल्या बदलाची माहिती अंमलदार वाघुले यांना नियंत्रण कक्षामार्फत मिळाली होती. मात्र, त्यांनी ही महत्त्वाची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याला वेळेत दिली नाही. ही बाब सभापती शिंदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे ती तत्काळ मांडली.
पोलीस अधीक्षक घार्गे यांनी यासंदर्भात तातडीने प्राथमिक चौकशी करून वाघुले याने बंदोबस्ताबाबत कसुरी केल्याचे स्पष्ट झाले. परिणामी त्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.
