आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली योगासने -डॉ. कोरडे

1 min read

निमगाव सावा दि.२१:- निमगाव सावा (ता. जुन्नर) जगभरात दरवर्षी 21 जून रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिन श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय निमगाव सावा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निरोगी आणि संतुलित जीवनासाठी योगाचे महत्त्व या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.सकाळी 9 वाजता महाविद्यालय प्रांगणामध्ये आयोजित मुख्य कार्यक्रमात इतिहास तज्ञ डॉ.शाकुराव कोरडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, कला शाखा समन्वयक प्रा. सुभाष घोडे, वाणिज्य शाखा समन्वयक प्रा.ज्योती गायकवाड, विज्ञान शाखा समन्वयक प्रा.प्रवीण गोरडे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र संयोजक प्रा. अनिल पडवळ यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि योगाप्रेमींनी सहभाग घेतला. डॉ.शाकुराव कोरडे यांनी उपस्थितांना विविध योगासने आणि प्राणायाम शिकवले. ‘सूर्यनमस्कार’, ‘ताडासन’, ‘वृक्षासन’, ‘भुजंगासन’ अशा अनेक आसनांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आणि त्यांचे फायदे समजावून सांगितले. कार्यक्रमादरम्यान, उपस्थितांना योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले फायदे समजावून सांगण्यात आले. योगामुळे केवळ शरीर लवचिक आणि निरोगी राहत नाही, तर ताण कमी होतो, एकाग्रता वाढते आणि मन शांत राहण्यास मदत होते. याविषयी बोलताना डॉ. कोरडे “योग ही एक प्राचीन भारतीय विद्या असून ती शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा संगम आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगामुळे आपण स्वतःला शांत आणि स्थिर ठेवू शकतो, ज्यामुळे आपले कार्य अधिक प्रभावी होते आणि जीवन अधिक आनंदी होते.त्यांनी दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले आणि नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या उत्साही आणि प्रेरणादायी सोहळ्यामुळे, योगाचे महत्त्व घराघरात पोहोचण्यास मदत होईल आणि अधिकाधिक लोक निरोगी जीवनासाठी योगाचा अवलंब करतील अशी आशा व्यक्त करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!