करंजी घाटात सहा वाहनांचा विचित्र अपघात
1 min read
पाथर्डी दि.२०:- अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नगरकडून पाथर्डीकडे जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या एसटी बस, इनोव्हा कार, टेम्पो, जीप आणि मोटरसायकल अशा पाच वाहनांना धडक दिल्याने
या अपघातामध्ये एसटी बस मधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. तसेच मोटर सायकलस्वार, इनोव्हा कार, टेम्पो, जीप मधील प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले आहेत. एसटी बसमधील जखमी प्रवाशांना तिसगाव येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले.
मात्र अपघातानंतर ट्रकचा चालक ट्रक घटनास्थळी सोडून पसार झाला.एकाच वेळी सहा वाहनांचा अपघात झाल्यामुळे करंजी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघात नेमक्या कोणत्या वाहनाचा झाला आणि कशामुळे झाला. याबाबत काही वेळ मोठी संभ्रम अवस्था निर्माण झाली होती.
एका ट्रकमुळे इतर पाच वाहनांचे अपघात या ठिकाणी झाले असून या अपघातामध्ये सर्व वाहनांचे मोठे नुकसान देखील झाले आहे.माणिक शहा पिरबाबा दर्गा जवळील धोकादायक वळणावरच अपघात झाला.
