जुन्नर व आंबेगावच्या शेतकऱ्यांचा सांगली जिल्ह्यात अभ्यासदौरा यशस्वी

1 min read

सांगली दि.१६:- जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा सांगली जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पडला. ऊस उत्पादनाच्या क्षेत्रात राज्यात नावाजलेले शेतकरी, त्यांच्या शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनवाढीच्या पद्धती जाणून घेण्याकरिता या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.या अभ्यासदौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी ऊस पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील नामवंत शेतकऱ्यांच्या शेतांना भेट दिली. कृषी भूषण पुरस्कार प्राप्त अमोल लकेसर यांच्या 147 टन उत्पादन देणाऱ्या फॉर्मची पाहणी करून उत्पादन तंत्र समजून घेतले. त्यानंतर महाराष्ट्रात ऊस उत्पादनाचा विक्रम करणारे कृषीनिष्ठ ऊस भूषण अशोक खोत यांच्या मायक्रो स्प्रिंकलरद्वारे विकसित प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी केली. खोत यांनी एकरी तब्बल 168 टन ऊस उत्पादन घेतले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल चर्चा करण्यात आली.कृषीरत्न संजीव माने यांच्या शेतातील AI आधारित तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्ष पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली. तसेच प्रशांत पाटील सर यांनी ऊस पिकाचे आर्थिक नियोजन याविषयी सखोल मार्गदर्शन केले.उद्योजक डॉ धनराज मुळीक सर यांच्या प्रगतशिल शेती पद्धतीची माहिती घेतली.दौर्‍याचा एक भाग म्हणून कोल्हापूर येथील कणेरी मठातील कृषी विज्ञान केंद्रालाही भेट देण्यात आली. येथे सेंद्रिय निविष्ठा केंद्र, गोशाळा, भाजीपाला किचन गार्डन, बियाणे विभाग आदी बाबत माहिती वसंत निकम सर यांनी दिली.या अभ्यासदौऱ्याचे यशस्वी आयोजन आत्मा कृषी विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धोंडीभाऊ पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या दौऱ्यात कृषीनिष्ठ विकास चव्हाण, विकास वाळुंज, ओमकार वाळुंज, कृषी मित्र उत्तम जाधव, मास्टर ट्रेनर बाबाजी बांगर, संपत चिंचवडे, बाबाजी बोऱ्हाडे शेतकरी सहभागी झाले होते. शेतीतील उत्पादनवाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि अनुभवातून शिकण्यासाठी झालेला हा अभ्यासदौरा उपस्थित शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!