बनावट ओळखपत्रांना आळा घालण्यासाठी मुंबई पाेलिसांना लवकरच डिजिटल ओळखपत्र
1 min read
मुंबई दि.३१:- बनावट ओळखपत्राद्वारे पोलीस असल्याचे भासवून नागरिकांची फसवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी गृह विभागाने आता मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना आता डिजिटल ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी चार कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास गृह खात्याने मंजुरी दिली आहे.मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सध्या छापील ओळखपत्र दिले जाते. या ओळखपत्राची नक्कल करून बनावट ओळखपत्र तयार करणे सहज शक्य होते. बऱ्याचदा अशाच ओळखपत्राद्वारे नागरिकांना धमकावून त्यांची फसवणूक केली जाते.
त्याचप्रमाणे ऑनलाइन माध्यमातूनही बनावट ओळखपत्राचा वापर करून ‘डिजिटल अटकेचे’ही प्रकार पोलीस दलाच्या समोर आले आहेत.या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई पोलीस आस्थापनेवर काम करणाऱ्या अधिकारी,
कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञानयुक्त ओळखपत्र देण्याचा प्रस्ताव मुंबई पोलीस आयुक्तांनी गृह विभागाला सादर केला होता. विभागाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. मुंबई पोलीस दलाच्या आस्थापनेवर अधिकारी- कर्मचाऱ्यांची मिळून ५१ हजार ३०८ पदे मंजूर आहेत.
या सर्वांना डिजिटल ओळखपत्र दिले जाणार आहे. पोलिसांना असे ओळखपत्र देणारे मुंबई पोलीस आयुक्तालय हे पहिले शासकीय कार्यालय ठरणार आहे. दरम्यान, तंत्रज्ञानयुक्त ओळखपत्र तयार करताना गोपनीयता पाळणे आवश्यक असल्याने मुंबई पोलीस आयुक्तांना त्यांच्या स्तरावर बंद निविदा प्रक्रिया राबविण्यास गृह खात्याने मान्यता दिली आहे.