दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अडकली पोलिसांच्या सापळ्यात

1 min read

राहता दि.१७:- लोणी प्रवरा (ता. राहाता) येथे दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केली. अजय राजू भोसले (वय 25, रा. शिर्डी, ता. राहाता), ऋतुंजय अविनाश कुंदे (वय 19, रा. एकरुखे, ता. राहाता), योगेश किशोर कांबळे (ता. 19, रा. शिर्डी, ता. राहाता), साईराम राजू गुडे (वय 23, रा. पिंपळवाडी रस्ता, शिर्डी, ता. राहाता) व एक अल्पवयीन मुलगा असे टोळीतील पाच जण जेरबंद करण्यात आले. तर एक आरोपी पसार झाला.


स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, अहमदनगर-शिर्डी रस्त्यावरील पिंपरी निर्मळ परिसरात एका चारचाकी वाहनातून सहा जण दरोडा घालण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना जेरबंद केले. पोलीस दिसताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला.

मात्र उर्वरित पाच आरोपींना पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून एक कोयता, चाकू, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड व चारचाकी वाहन असा पाच लाख 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींना लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जेरबंद आरोपींपैकी तीन आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. ऋतुंजय कुंदे व साईराज गुडे यांच्यावर प्रत्य़ेकी दोन तर अजय भोसले याच्यावर एक गुन्हा या पूर्वीच दाखल आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे