नारायणगावात बंद फ्लॅटच कुलूप तोडून चोरट्यांनी २० लाख रुपयांचे दागिने व ३ लाख रुपयांची रोकड पळवली
1 min readनारायणगाव दि.१५:- नारायणगाव (ता.जुन्नर) येथील श्री गजानन अपार्टमेंट मधील बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील तीन लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे ३९ तोळे दागिने असा तेवीस लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीची घटना रविवारी (दि. १४) दुपारी झाली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
अशी माहिती नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.या बाबत सविस्तर माहिती अशी की पुणे – नाशिक महामार्गालगत राहणारे नारायणगाव ग्रामपंचायतिचे माजी उपसरपंच आशिष माळवदकर व जुन्नर पंचायत समितीच्या माजी सदस्या अर्चना आशिष माळवदकर यांचा जीवन हॉटेलच्या बाजूला ओम नमो श्री गजानन अपार्टमेंट हा तीन मजली बंगला आहे.
या पैकी तिसऱ्या मजल्यावर आशिष माळवदकर हे राहतात. तर इतर दोन मजल्यावर त्यांचे बंधू राहतात. नारायणगाव येथील मूथा मार्केटमध्ये अर्चना माळवदकर यांचे साड्या विक्रीचे दुकान आहे. रोज सकाळी दहा ते सायंकाळी आठ या वेळेत माळवदकर दाम्पत्य हे फ्लॅट बंद करून दुकानात जातात.नेहमी प्रमाणे रविवारी सकाळी साडेदहा वाजता आशिष व त्यांच्या पत्नी अर्चना या घराला व बेडरूमला कुलूप लावून नारायणगाव येथील कापड दुकानात गेले. सायंकाळी आठ वाजता घरी आले असता घराच्या मुख्य दरवाजाचे व बेडरूचे कुलूप तोडून चोरट्यांनी बेडरूममधील दोन कपाटातील रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे दागिने असा तेवीस लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
आशिष माळवदकर यांनी या बाबतची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, फौजदार सनील धनवे घटनास्थळी आले.पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.