अंगावरची हळद ओली, लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी जवान गेला देशसेवेसाठी सीमेवर; नववधू म्हणाली ‘आँपरेशन सिंदूर’साठी माझं सौभाग्य पाठवतेय

1 min read

जळगाव दि.९:- जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानांना तात्काळ पुन्हा सैन्य दलाच्या मुख्यालय येथे येण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. देशसेवेसाठी लग्नाची हळद फिटली नसताना देखील जळगाव मधील पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील जवान मनोज पाटील हा कर्तव्यावर रवाना झाला आहे.सन 2017 मध्ये सैन्यात दाखल झालेल्या मनोज पाटील यांचा सोमवारी 5 मे रोजी विवाह झाला. देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्यांना सैन्य दलाकडून त्वरेने बोलावणे आले आहे. त्यांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक ८ मे रोजी सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला असून आज ते रवाना झाले आहेत. आज नववधुसोबत मनोज पाटील सत्यनारायणाच्या पुजेला बसणार होते. पण पूजा रद्द करुन जवान मनोज पाटील रवाना झाले आहेत. लग्नाची मनोहर स्वप्ने, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना, या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी लग्न झाले. मनोज ज्ञानेश्वर पाटील हे नंदीचे खेडगाव येथील सैनिक हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी आज गुरुवारी सीमेवर रवाना झाले आहेत.पाचोरा तालुक्यातील नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोजचे लग्न ठरले. लग्नासाठी सुटी घेऊन मनोज गावी आले होते, पाचोरा येथे लग्न समारंभ पार पडत नाही, तोच मनोज यांस कर्तव्याच्या ठिकाणी त्वरेने बोलावणे आले आहे. कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच कर्तव्यावर जावे लागत असल्यामुळे घरातील मंडळींना थोडे दुःख झाले. पण या परिस्थितीत माझ्या मुलाचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या वडिलांनी दिली आहे. देशापेक्षा मोठे काहीही नाही या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या पत्नीने दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे