पाकिस्तानला आर्थिक धक्का; ५०० दशलक्ष किंमतीच्या वस्तूंवर भारताकडून बंदी
1 min read
दिल्ली दि.६:- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्यास सुरुवात केली. यासाठी थेट पाकिस्तान किंवा मध्यस्थ राष्ट्रांद्वारे होणाऱ्या आयातींवर संपूर्णपणे बंदी घातली.
तसेच पाकिस्तान नोंदणीकृत जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले. पाकिस्तानच्या आयातीवर बंदी घातल्यानंतर तब्बल ५०० दशलक्ष डॉलर्सच्या पाकिस्तानी वस्तू दुसऱ्या देशाच्या माध्यमातून भारतात आयात करण्याचे षडयंत्र पाकिस्तानने रचले होते.
पाकिस्तानचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आता सीमाशुल्क विभाग अधिक सतर्क झाला आहे. पाकिस्तानातील फळे, सुका खजूर, कापड, सोडा राख, रॉक सॉल्ट आणि चामडे अशा वस्तूंची पुन्हा पॅकिंग
आणि रिलेबलिंग करून या वस्तू भारतीय बाजारपेठेत आणण्यासाठी तयार असल्याचे समजते. या वस्तूंची किंमत ५०० दशलक्ष डॉलर्स असल्याचे सांगितले जाते.
संयुक्त अरब अमिराती (यूएई), सिंगापूर, इंडोनेशिया किंवा श्रीलंका यासारख्या तिसऱ्या किंवा मध्यस्थ राष्ट्रांकडून हा माल भारतीय बाजारपेठेत येणार होता.
पाकिस्तानमधून थेट अधिकृत मार्गाने भारतात येणाऱ्या वस्तूची संख्या नगण्य असली तरी तिसऱ्या देशांमधून येणाऱ्या पाकिस्तानी वस्तूंची संख्या मोठी आहे. म्हणूनच सरकारने २ मे रोजी पाकिस्तानमधून होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयतीवर बंदी घालण्यात आल्याचा आदेश जारी केला.
फेब्रुवारी २०१९ साली पुलवामा येथे हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा काढून घेतला होता. तेव्हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला पहिला मोठा धक्का बसला.
याशिवाय भारताने पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २०० टक्के सीमा शुल्क लादले होते. त्यामुळेच सीमेपलीकडून केल्या जाणाऱ्या निर्यातीत मोठी घट झाली होती.
शुक्रवारी (२ मे) सायंकाळी परराष्ट्र व्यापार महसंचालनालयाने (DGFT) सर्व पाकिस्तानी आयातींवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली. तसेच तिसऱ्या देशातून केल्या जाणाऱ्या आयातीवरही सरकारी संस्थांना कडक नजर ठेवण्यास सांगितले आहे.
पाकिस्तानी वस्तू इतर देशांतून आपल्याकडे येण्यापासून रोखायचे असतील तर सीमाशुल्कासह इतर यंत्रणांनाही खबरदारी घ्यावी लागेल. त्यासाठी हे आदेश महत्त्वाचे होते.